अतिवृष्टीबधितांना एनडीआरएफच्या नियमानुसार लवकरच मदत दिली जाणार – देवेंद्र फडणवीस
राज्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नांदेडमध्ये ढगफुटीसदृश परिस्थिती असून आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, काही ठिकाणी जनावरंही दगावली आहेत. राज्यात १२ ते १४ लाख हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले असून, याबाबत पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मुख्यमंत्र्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील पावसाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. १२ ते १४ लाख हेक्टर शेतपिके बाधित झाली असून, जनावरांचेही नुकसान झाले आहे. नांदेडमध्ये ढगफुटीसदृश परिस्थिती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.
अतिवृष्टीबधितांना एनडीआरएफच्या नियमानुसार लवकरच मदत
दरम्यान, शेतपिकांच्या नुकसानीबाबत विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले, “जिथे मानवी मृत्यू, जनावरांचे नुकसान किंवा घरांचे नुकसान झाले आहे, तिथे जिल्हाधिकाऱ्यांना नियमानुसार आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. यशिवाय जिथं शेतपिकांचं नुकसान झालं आहे, तिथे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, एनडीआरएफच्या नियमानुसार लवकरच मदत दिली जाणार आहे.”