कांदा उत्पादकांना मोठा दनका ; श्रीलंकेनं कांद्यावरील आयातशुल्क 5 पटीने वाढवले…
श्रीलंका भारतातून कांद्याची आयात करत असली, तरी गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक शेतकरीही कांद्याचे उत्पादन घेत आहेत. सध्या श्रीलंकेतील खरीप हंगामातील कांदा बाजारात आला आहे. स्थानिक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कांदा उत्पादकांना मोठा दनका
यापूर्वी कांद्यावर प्रति किलो १० श्रीलंकन रुपये आयात शुल्क होते, जे २७ ऑगस्टपासून वाढवून ५० श्रीलंकन रुपये करण्यात आले आहे. हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांच्या मते, या निर्णयामुळे भारतीय रुपयांमध्ये प्रति किलो आयात शुल्क ३.३३ रुपयांवरून १६.६६ रुपयांपर्यंत वाढले आहे.
श्रीलंकेची दर महिन्याची कांद्याची गरज साधारणपणे २५,००० टन असते. भारतीय निर्यातदारांच्या माहितीनुसार, भारतातून श्रीलंकेत दर आठवड्याला २,५०० ते ३,००० टन कांदा निर्यात होतो. मात्र, भारताच्या अस्थिर निर्यात धोरणांमुळे श्रीलंकेला मोठा फटका बसला असून, यामुळे देशांतर्गत कांदा उत्पादनाला चालना मिळाली आहे.
श्रीलंकेत खरीप हंगामात सुमारे ५५,००० ते ६०,००० टन कांद्याचे उत्पादन होते. स्थानिक कांदा काढणी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थ व नियोजन मंत्री अनुरा कुमार दिसानायके यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर देशांप्रमाणे श्रीलंकेने भारतीय कांद्यावर आयात बंदी घातलेली नाही, पण स्थानिक उत्पादन सुरू झाल्यावर आयात शुल्क वाढवले जाते.
सध्या पुढील महिनाभर देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा कांदा उपलब्ध असल्याने हे वाढीव शुल्क कायम राहील. स्थानिक साठा संपल्यावर शुल्क पुन्हा पूर्वीसारखे होईल आणि निर्यात पूर्ववत होईल, असे निर्यातदारांनी सांगितले आहे.